• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

पानगाव रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी व्हावे नवा प्रस्ताव दाखल करा तातडीने मंजूरी घेवूमहामार्ग अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या बैठकीत आ. रमेशआप्पा कराड यांची सूचना

पानगाव रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी व्हावे 
नवा प्रस्ताव दाखल करा तातडीने मंजूरी घेवू
महामार्ग अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या बैठकीत आ. रमेशआप्पा कराड यांची सूचना
 लातूर दि.१३- पानगाव ते खरोळा पाटी दरम्यानच्या बंद पडलेल्या रस्त्याच्या कामाचा सिमेंट काँक्रीट ऐवजी डांबरीकरणाचा नव्याने प्रस्ताव तयार करून तात्काळ दाखल करा अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करून या प्रस्तावास मंत्री महोदयासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून, बोलून तातडीने मंजूर करून घेऊ आणि हा रस्ता पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील राहू असे लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी ग्रामस्थांना बोलून दाखवले.
         रेणापूर तालुक्यातील मौजे पानगाव येथून जाणाऱ्या उमरगा ते खामगाव या राष्ट्रीय महामार्गाला २०१८ मध्ये मंजुरी मिळाली होती मात्र पानगाव ते खरोळा पाटी दरम्यान रस्त्यालगतच्या काही शेतकऱ्यांनी अडचणी निर्माण केल्याने या मार्गाचे काम रखडले होते. नागरिकांची अडचण आणि गैरसोय लक्षात घेऊन शासनाने नव्याने मंजुरी देऊन गेल्या ११ डिसेंबर २०२४ रोजी सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या कामाला आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍नातून प्रत्यक्ष सुरुवात झाली होती. रस्त्याच्या प्रश्नी काही शेतकरी न्यायालयात गेले त्यांची बाजू ऐकून जुन्या काळात असलेल्या रस्त्याच्या रुंदीप्रमाणे काम करावे अशा सूचना न्यायालयाने रस्ते महामार्ग विभागाला केल्या. जुन्या काळात अस्तित्वात असलेला रस्ता अरुंद असल्याने सिमेंट काँक्रेटचा रस्ता करणे शक्य नसल्याने पुन्हा एकदा या रस्त्याच्या काम बंद पडले. 
          रस्त्याचे काम रखडल्याने पानगाव शहर आणि आजूबाजूचे २०-२५ गावातील व्यापारी वाहनधारकासह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याची जाणीव लक्षात घेऊन लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी रस्ते महामार्ग लातूर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण सुमंत, अभियंता शशिकांत उरगुंडे आणि शाखा अभियंता मुंडे यांच्याकडून रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी पानगाव येथील माजी सरपंच प्रदीप कुलकर्णी, सुकेश भंडारे, सुरेंद्र हरिदास, बब्रुवान संपत्ते, ज्ञानोबा फुले, बब्रुवान भंडारे, योगीराज शिरसाट, चंद्रकांत आरडले, अमर चव्‍हाण गोपाळ शेंडगे, गणेश तूरूप, शाम फुले, सतीश कुलकर्णी, दत्तात्रय भंडारे, विश्वनाथ रोकडे, मारुती गालफडे, सूर्यकांत गालफडे यांच्यासह इतर अनेकांची उपस्थिती होती.
         सुरुवातीच्या काळातच रस्त्याच्या कामाला अडचण केली नसती तर पाच वर्षांपूर्वीच रस्त्याचे काम पूर्ण झाले असते असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार भूमी अभिलेख विभागाने मोजणी केलेल्या जुन्या रस्त्याप्रमाणे नव्याने सदर रस्त्याचे सिमेंट काँक्रीट चे काम होणे शक्य नाही त्यामुळे रस्त्याच्या उर्वरित अंतरावर डांबरीकरणाचे काम करण्यासाठी नव्याने प्रस्ताव तयार करून तात्काळ शासनाकडे पाठवावा अशी सूचना अधिकाऱ्यांना करून हा प्रस्ताव संबंधित मंत्रीमहोदय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून तातडीने मंजूर करून घेऊ सदरचा रस्ता पावसाळ्यापूर्वी व्हावा या अनुषंगाने सर्व ती प्रक्रिया करावी असे बोलून दाखविले. 
          रस्ता कामासाठी अनेकांनी सहमती दर्शविली असून सदर रस्ता गाव नकाशावर आणण्यासाठी गाव नकाशा अद्यावत करून घ्यावा रस्त्यासाठी पानगाव आणि परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन कशा पद्धतीने लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करावेत असे बोलून दाखविले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने