‘रेझिंग डे’ निमित्त ३ जानेवारी व ४ जानेवारी रोजी लातूर पोलिसांकडून जिल्हा क्रीडा संकुलात “भव्य पोलीस प्रदर्शन” चे आयोजन.
दिनांक 02/01/2025
भारताचे दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलिस दलास ध्वज सुपूर्त केला होता. तेंव्हा पासून २ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलिस विभागाच्या वतीने रेझिंग डे म्हणून साजरा केला जात आहे. रेसिंग डे निमित्त दिनांक २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
कायम ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांचे कामकाज कसे चालते याविषयी विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक ३ व ४ जानेवारी रोजी लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे भव्य पोलीस प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात सर्व प्रकारच्या रायफल, बंदुका व ईतर शस्त्रांची माहिती व प्रदर्शन, सायबर विभागा कडून सायबर गुन्हे मार्गदर्शन, डायल 112 कार्यपध्दती व मार्गदर्शन, बिनतरीर संदेश विभाग कार्यपध्दती व मार्गदर्शन, श्वान पथक प्रात्यक्षिक, भरोसा सेल कडून विविध हेल्पलाइन व पोलिस पदश्रेणी यांची माहिती, फिंगरप्रिंट विभागाकडून इन्वेस्टीगेशन टूल्स ची माहिती व क्राईम सिन, वाहतूक शाखा, मोटार परिवहन विभागा कडून विविध पोलिस वाहने, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून विद्यार्थी व महिलांना संदर्भातील मार्गदर्शन, बॉम्बशोधक व नाशक पथक, विविध शाळा महाविद्यालये यांचे कडून पथनाटे व स्किट सादर करण्यात येणार आहे.
याशिवाय ‘भेट पोलिस स्टेशनला’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोलिस ठाण्यांना भेट आयोजित केल्या आहेत. त्यांना पोलिस खात्याच्या कामकाजाविषयी माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सदर पोलीस प्रदर्शनास लातूर शहर व जिल्ह्यातील सर्व शाळा विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी भेट द्यावी अशी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Tags
The महाराष्ट्र News