लातूर-टेंभुर्णी च्या चौपदरीकरणासाठी ५७४ कोटी निधी मंजूर;
केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आ. कराड यांनी मानले आभार
लातूर दि. २० - गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या लातूर-टेंभुर्णी या रस्त्याच्या कामाचे केंद्र शासनाच्या वतीने वेगवेगळे टप्पे मंजूर करण्यात येत आहेत. त्यानुसार या रस्त्यावरील ३७ किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरण महामार्गासाठी ५७४ कोटींचा निधी केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री ना. नितीनजी गडकरी यांनी मंजूर केला आहे. सदरील निधी मंजूर करून रस्त्याच्या कामाला गती दिल्याबद्दल लातूर ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
पुणे - मुंबईकडे जाणारा लातूर ते टेंभुर्णी हा महामार्ग गेल्या अनेक वर्षापासून रखडला होता. लातूरकरांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याने या रस्त्याच्या कामाला निधी मिळावा यासाठी वेळोवेळी केंद्रीय रस्ते विकास मंत्री मा. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन आ रमेशआप्पा कराड यांनी आग्रहाची मागणी केली होती. सदरील रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने या रस्त्याच्या कामाला टप्प्याटप्प्याने निधीची तरतूद करून कामाला गती देण्यात येत आहे.
लातूर - टेंभुर्णी या महामार्ग-६३ वरील जावळे-बोरगाव काळे दरम्यानच्या ३७.५२५ किलोमीटर मार्गाच्या पेव्हड शोल्डरसहित ४-लेन पुनर्वसन आणि अपग्रेडेशनसाठी ५७४.१८ कोटी रुपयांसह मंजुरी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांना जोडण्यांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. तसेच कृषी मालाची वाहतूक आणि व्यावसायिकांसाठी देखील हा मार्ग महत्त्वपूर्ण आहे. सदरच्या महामार्गाला तब्बल 574 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कामाला गती दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे.