• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

मतदार संघ माझे कुटुंब" याच भावनेतून सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार – आमदार रमेशआप्पा कराड


लातूर दि. ०१- लातूर ग्रामीण मतदार संघात विकास कामे करताना आजपर्यंत कधीही जात, धर्म पाहिला नाही यापुढील काळातही संपूर्ण मतदारसंघ हेच माझे कुटुंब याच भावनेतून मतदार संघातील गावागावात वाडी वस्तीत सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार आहे. कार्यकर्त्यांनीही सर्व समाज घटकांना सोबत घेऊन गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान लातूर ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार रमेशआप्पा कराड यांनी केले.
        लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार आ. रमेशआप्पा कराड यांचा घवघवीत यश संपादन करून नवा इतिहास घडविल्यानंतर आज रविवारी सकाळी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात आ. रमेशआप्पा कराड यांचा खरोळा जिल्हा परिषद मतदार संघातील विविध गावातील भाजपासह महायुती कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजपा पंचायत राज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र गोडभरले, तालुकाध्यक्ष अँड दशरथ सरवदे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष वसंत करमुडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गोडभरले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या सत्कार कार्यक्रमास भाजपासह महायुतीचे कार्यकर्ते मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे उपकार मी कदापी विसरू शकत नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार समजून काम केले. केलेल्या प्रयत्नाला यश आले याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, विधानसभेची ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच झाली. या लढाईत धनशक्तीचा पराभव होऊन जनशक्तीचा विजय झाला आहे. देशमुख यांनी अनेकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला मात्र माझा गरीब कार्यकर्ता विकला गेला नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार समजून या निवडणुकीत गावागावात भाजपाला कशा पद्धतीने मताधिक्य मिळेल यासाठीच प्रयत्न केले कार्यकर्त्याच्या मेहनतीने आणि लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने आपल्याला हे यश मिळाले आहे. 
        गेल्या १५ - २० वर्षापासून बलाढ्य शक्तीच्या विरुद्ध गोरगरीब सामान्य माणसाच्या हितासाठी संघर्ष केला या संघर्षाला कार्यकर्त्यांनी साथ दिली. विधान परिषदेचा आमदार या नात्याने काम करत असताना मतदार संघात शेकडो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि गावागावातील विकास कामांना गती दिली. आता विधानसभा आमदारकीच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवू लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ एक विकासाचे मॉडेल मतदार संघ निर्माण करू असे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, देशात आणि राज्यात आपले सरकार असल्याने गोरगरीब सर्वसामान्य गरजू प्रत्येक व्यक्तीपर्यंत विकास पोहोचला पाहिजे यासाठी आपण सर्वजण काम करू. येणाऱ्या काळात होणाऱ्या ग्रामपंचायत, सोसायटीसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका जिंकायच्या आहेत आज माझ्यासाठी काम केले येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांना मान सन्मान निवडून देण्यासाठी पदावर बसविण्यासाठी काम करणार असल्याचे आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले.
       ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोडणी बाबत भीती बाळगण्याचे अथवा घाबरण्याची गरज नाही मी तुमच्या पाठीशी आहे. आडवणूक अथवा पिळवणूक होवू देणार नाही साखर कारखान्यांनी ऊस तोडणी कार्यक्रमांनुसारच शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी करावी जोपर्यंत कारखाना कार्यक्षेत्रात ऊस आहे तोपर्यंत कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेनचा ऊस येता कामा नये यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू अशीही ग्वाही आ. कराड यांनी यावेळी बोलताना दिली. प्रारंभी महेंद्र गोडभरले यांनी प्रास्ताविक केले तर नवनाथ भोसले यांनी सविस्तर मनोगत व्यक्त करून रमेशआप्पा आमदार व्हावेत हे अनेक वर्षापासून कार्यकर्त्यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले असल्याचे बोलून दाखविले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने