• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

रामेश्वर : चुरशीच्या लढतीत पुण्याचा सुहास घोडके महाराष्ट्र कुस्ती महा-वीर किताबाचा ठरला मानकर

रामेश्वर : चुरशीच्या लढतीत पुण्याचा सुहास घोडके महाराष्ट्र कुस्ती महा-वीर किताबाचा ठरला मानकर          लातूर दि. २२- पुणे येथील सुहास घोडके आणि कुर्डूवाडीचा प्रमोद सुळ यांच्यात लातूर तालुक्‍यातील मौजे रामेश्‍वर येथे झालेल्‍या चुरशीच्या लढतीत सुहास घोडके यांने ५-० अंकाने महाराष्ट्र कुस्ती महा-वीर हा खुल्या गटातील किताब मिळविला. रुपये सव्‍वा लाख रोख, चांदीची गदा, सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, पुरातन यज्ञभूमी रामेश्वर (रुई) ग्रामस्थ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा रामेश्वर (रुई) येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा गेल्या १८ वर्षापासून भरविण्यात येत आहेत. प्रतिवर्षाप्रामणे याही वर्षी २१ मार्च शुक्रवार रोजी मोठया उत्‍साहाच्‍या वातावरणात कुस्‍त्‍यांची दंगल झाली. या कुस्‍ती स्पर्धेत राज्‍यभरातून २०० पेक्षा अधिक मल्लांनी भाग घेतला होता. 
          पुणे येथील सुहास घोडके आणि कुर्डूवाडीचा प्रमोद सुळ यांच्यात शेवटची अत्‍यंत चुरशीची लढत झाली यात सुहास घोडके यांने ५-० अंकाने विजय मिळवत महाराष्ट्र कुस्ती महा-वीर हा खुल्या गटातील किताब मिळविला. त्‍यांचा सव्‍वा लाख रोख, चांदीची गदा, सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. तर प्रमोद सुळ यांनी उपविजेते पद मिळविले. त्यांना रौप्यपदक व रोख रुपये १ लाखाचे पारितोषिक देण्यात आले. जामखेड येथील सागर मोहोळकर यांला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला रुपये ५० हजार रोख व कांस्य पदक देण्यात आले. चतुर्थ क्रमांकावर सोलापूर येथील कालीचरण सोलणकर याला २५ हजार रूपये रोख व पदक देण्यात आले.
           हिंद केसरी दीनानाथ सिंग, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, , रामेश्वरचे माजी सरपंच तुळशीराम कराड, काशीराम कराड, लातूर ग्रामीणचे आ. रमेशआप्पा कराड, डॉ. हनुमंत कराड, राजेश कराड, ऋषिकेश कराड, प्रा. विलास कथुरे यांच्या हस्ते विजेत्यां मल्लांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी वस्ताद पै. निखिल वणवे उपस्थित होते. 
          ७५ पेक्षा अधिक वर्षे वय असलेले अनेक मल्ल सहभागी झाले होते. या पैकी तात्या शेषराव नलावडे हे विजेते ठरले तर विष्णू हे उपविजेते ठरले. या पैलवानांचा योग महर्षी स्वातंत्र्यसेनानी  वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलार मामा स्मृती सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके देऊन सत्कार करण्यात आला             प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले," रामेश्वरच्या मातीतून आज ना उदया राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू निर्माण होतील. भारताच्या कुस्तीक्षेत्रामध्ये आपले नाव उज्वल करतील. कुस्ती या क्रीडा प्रकारात आपले मन आणि मनगट मजबूत होते. आजच्या तरुणांनी कुस्तीकडे वळणे गरजचे आहे.” या वेळी जालना येथील मंठा गावातील पैलवान वैष्णवी रामकिसण सोळंके हिने १५ मिनीटात अद्वितीय योगासनाचे प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.  श्री. बाबा निम्हण यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन व धावते वर्णन केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने