• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

जल जीवन मिशन चा बोगस कामांचा धडाका

मोझे खोपेगाव, चांडेश्वर व कासारगाव परिसरातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचे वास्तव हळूहळू समोर येत आहे. पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने मोठ्या अपेक्षेने राबवलेली ही योजना सध्या कागदावरच यशस्वी असल्याचे चित्र आहे.

खोपेगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेली पाण्याची टाकी पहिल्याच दिवसापासून गळती सुरू झाली असून, ही टाकी किमान २५ वर्षे टिकण्याच्या दाव्याखाली उभारली गेली होती. मात्र प्रत्यक्षात वापर होण्या अगोदरच टाकीतून पाणी झिरपू लागल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या टाकीला जोडण्यात आलेल्या पाईपलाईनचे कामही निकृष्ट दर्जाचे असून, ही पाईपलाईन आवश्यकतेनुसार किमान तीन फूट खोल घालणे आवश्यक होते. परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी ही पाईपलाईन पूर्णतः उघड्यावर पडली आहे. त्यामुळे पाणीगळती, पाईप फुटणे किंवा घाण पाण्याची मिसळ होण्याचा धोका सतत जाणवत आहे. काही ठिकाणी ही पाईपलाईन लिकेज झाल्याचे चित्र नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.
टाकीमध्ये साठवले जाणारे पाणी थेट पाझर तलावातून आणले जात आहे. मात्र हे पाणी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेविना थेट वापरले जात आहे का, याबाबत कुठलीही स्पष्टता उपलब्ध नाही. त्यामुळे या पाण्याचे परीक्षण झाले आहे की नाही, आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे का, हे प्रश्न सध्या उभे राहत आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून या योजनेअंतर्गत गावोगावी कामे सुरू आहेत. मात्र ही कामे कशी, कोणाच्या देखरेखीखाली, आणि कोणत्या तांत्रिक अटींच्या आधारे केली जात आहेत, याकडे प्रशासनाचे लक्ष आहे का, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावू लागला आहे.
सरकारच्या अतिमहत्त्वाकांक्षी योजनेतून गावांना स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळावे, असा हेतू असताना या योजनेअंतर्गत होत असलेले कामच जर निकृष्ट असेल, तर गावकऱ्यांच्या आशा पूर्ण होण्याऐवजी त्यांचा हिरमोडच होणार आहे. लाखो रुपयांचा निधी खर्चूनही जर टाकी गळू लागली आणि पाईपलाइन उघड्यावर फुटू लागली, तर योजनेचा मूळ उद्देशच व्यर्थ ठरण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा ही केवळ यंत्रणा नाही, तर ती गावाच्या आरोग्याची व रोजच्या जीवनाच्या सुरक्षिततेची गरज आहे. त्या गरजेवर अशा प्रकारे तडजोड करणाऱ्या कामांची जबाबदारी नेमकी कोणावर आहे, हे पाहणे अत्यंत आवश्यक झाले आहे. सद्यस्थितीत नागरिक या सगळ्या प्रक्रियेकडे अत्यंत संशयाने पाहत आहेत.
सध्या तरी गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून, काही ठिकाणी लेखी स्वरूपात पत्रव्यवहारही झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. ही दुर्लक्ष वृत्तीच भविष्यात मोठा धोका ठरू शकते, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने