शेतकऱ्यासह मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा
मोदीसरकारचा अर्थसंकल्प जाहीर-आ. कराड
लातूर दि.०१- कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर्तेकडे घेऊन जाण्यावर भर दिला असून क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखाहून पाच लाखापर्यंत करण्याची घोषणा करून शेतकऱ्यांना त्याचबरोबर बारा लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करून मध्यमवर्गीयासह नोकरदारांना दिलासा देणारा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झाला असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी व्यक्त केली.
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी आज शनिवारी संसदेच्या सभागृहात सादर केला यावर्षीच्या अर्थसंकल्पात त्यांनी शेती, उत्पादन, रोजगार, सूक्ष्म मध्यम आणि लघुउद्योग, ग्रामीण भागाचा विकास आणि संशोधन या दहा विशेष क्षेत्रावर भर दिला आहे.
कृषी क्षेत्र आत्मनिर्भर तिकडे घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान धन्य कृषी योजनेचा देशभरातील १०० जिल्ह्यात १ कोटी ७० लक्ष शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे किसान क्रेडिट कार्ड वरील कर्जाची मर्यादा तीन लाखावरून पाच लाख करण्यात येत असल्याची घोषणा करून अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी तूर, उडीद, मसूर या डाळीच्या पिकांबरोबरच कापूस उत्पन्न वाढीसाठी आणि भाजीपाला व फळाचे विशेष उत्पादन वाढविण्यासाठी व किफायतशीर दर देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे बोलून दाखविले. शेतकऱ्यांसाठी हा दिलासा देणारा निर्णय आहे.
नवीन कर प्रणालीत फेरबदल करून १२ लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न कर मुक्त करण्याचा निर्णय जाहीर करून मध्यमवर्गीयासह नोकरदारांना मोठा दिलासा दिला असल्याचे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, गोरगरिबांच्या हितासाठी अनेक योजना जाहीर केल्या वेगवेगळ्या क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली, शिक्षण क्षेत्राला महत्त्व देऊन पुढील पाच वर्षात वैद्यकीय महाविद्यालयातील ७५ हजार जागा वाढवण्याचे घोषित केले. कर्करोग आजाराच्या रुग्णांसाठी दिलासा देऊन ३६ जीवनावश्यक औषधांना करातून सूट जाहीर केली.
महिलांना उद्योग वाढीसाठी प्रशिक्षण, मार्केटिंग आणि सरकारी योजनाशी जोडण्याची संधी दिली जाणार असून एससी आणि एसटीच्या पाच लाख नव्या महिला उद्योजकांसाठी दोन कोटी रुपये मुदतीचे कर्ज मिळणार आहे. एकूणच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी देशहित आणि देशातील सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प जाहीर केला खऱ्या अर्थाने सर्व क्षेत्राला निश्चितपणे दिलासा मिळणार असल्याचे आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले.
Tags
The महाराष्ट्र News